मंत्र्याचा विना चप्पल वावर

राजकीय नेते आणि आध्यात्मिक गुरु यांच्यात अनोखे भावबंध असतात. देशात आणि राज्यातही वेगवेगळ्या पक्षांच्या लहान नेत्यांपासून मोठ-मोठ्या नेत्यांचे आध्यात्मिक गुरू असतात. कित्येक वेळा तर दोन वेगवेगळ्या पक्षांमधील नेत्यांचा एकच आध्यात्मिक गुरू असतो. अशा नेत्यांवर या आध्यात्मिक गुरुचा प्रभाव इतका असतो की, 'बोले तैसा चाले' अशी परिस्थिती असते.

राज्यात "गृह" नव्याने निर्माण करणाऱ्या एका मंत्र्याला त्यांच्या आध्यात्मिक गुरुने दीड महिने पायात चप्पल किंवा बूट घालू नये, असा आदेश दिला आहे. त्यामुळे हे मंत्रीमहोदय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विना चप्पल हजर होते. तसेच संपूर्ण मंत्रालयामध्ये विना चप्पल वावरत होते. मात्र या दीड महिन्यामध्ये जेवणाबाबत पथ्यं सांगितलं नाही.

या मंत्र्यांने काही वर्षांपूर्वी तंबाखू सोडण्याची शपथ घेतली होती. मात्र ती शपथ पूर्णपणे पाळू शकले नाहीत. गुरुचा आदेश असल्यामुळे या मंत्र्यांनी अगदी मनावर घेतला आहे आणि दीड महिना विना चप्पल वावरणार आहेत. मंत्री महाशय वेगळे मंत्रिपद मिळावे यासाठी किंवा अन्य कारणासाठी गुरुचा आदेश पाळत आहेत हे मात्र कळू शकले नाही.

काही वर्षांपूर्वी नारायण राणे यांचा पराभव होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही, अशी शपथ शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अरविंद भोसले यांनी घेतली होती. नारायण राणे यांचा पराभव झाल्यानंतरच अरविंद भोसले यांनी चप्पल घालणे सुरू केले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या