सरकार अल्पमतात, बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत; भाजपची मागणी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे, त्यामुळे राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावं अशी मागणी भाजपने राज्यपालांकडे केली आहे. राज्यपाल यावर योग्य तो निर्णय घेतील असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  म्हणाले.

राज्यात सुरू असलेल्या सत्तेच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यपालांना एक ई-मेलच्या माध्यमातून बंडखोर आमदारांनी पत्र दिलं आहे. शिवसेनेचे 39 आमदारांनी बंडखोरी केली असून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत रहायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निकालांचा अभ्यास करुन राज्यपाल त्यांना योग्य ते निर्देश देतील अशी आशा आम्हाला आहे."

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना बहुमत चाचणीचं पत्र दिल्याची बातमी व्हायरल झाली.

त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी 30 तारखेला विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती सर्वत्र पसरली. पण हे पञ राजभवनाचे नाही स्पष्ट करण्यात आले आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या