नवाब मलिकांवर कारवाई; महाविकास आघाडीचे मंत्रालयाजवळ आंदोलन

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयानं मलिक यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. त्यामुळं आता महाविकासआघाडीकडून आंदोलन केलं जात आहे.

महाविकास आघाडीकडून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येत आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतील नेते आंदोलनाला बसले आहेत.

'कोणत्याही मंत्र्याचं नाव दाऊदसोबत जोडलं की त्याची बदनामी करायला सुरूवात करतात. नवाब मलिकांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. भाजपा अनेक नेत्यांना धमकावत आहे. दाऊदचे संबंध मुद्दाम मलिकांसोबत जोडले जात आहेत, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. शिवाय, 'बॉम्बस्फोटाचा मलिकांसोबत अजिबात संबंध नाही', असंही भुजबळ यांनी म्हटलं.

'ज्या ठिकणी केंद्राला विरोध केला जातो तिथं अशी परिस्थिती आहे. नवाब मलिकांच्यावर केलेले आरोप चुकीच आहेत. ज्याने जागा खरेदी केली म्हणून त्यांना आतमध्ये टाकणे हे अत्यंत चुकीचं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे मी काहीही बोलणार नाही. नवाब मलिक यावर सविस्तर उत्तर देतील राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, त्यामुळ ते आमच्या मंत्रीमंडळात कायम राहतील', असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आंदोलनात हे नेते उपस्थित

आंदोलनाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना आमदार यामिनी जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, राज्यमंत्री अदिती तटकरे, शिवसेना नेते सचिन अहिर, महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार संदीप क्षीरसागर आदी नेते उपस्थित आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या