मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे 30 मेपासून बेमुदत उपोषण

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 30 मेपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

समर्थकांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले, “हे आंदोलन कडक उन्हात, कोणत्याही निवाऱ्याशिवाय, अन्न-पाण्याविना होणार आहे. यात एकतर मी हार मानेल किंवा सरकारला झुकावे लागेल.”

गेल्या दोन वर्षांत मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुख चेहरा बनले असून त्यांनी अनेक आंदोलने आणि उपोषणे केली आहेत. मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता देऊन OBC प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळावा, ही आंदोलनाची मुख्य मागणी असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

मुंबईतील आंदोलनावेळी सरकारने सातारा गॅझेट आणि कुणबी नोंदींबाबत दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. “दहा महिने झाले, अजून किती वाट पाहायची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जरांगे पाटील यांच्या मते, हैदराबाद गॅझेटमधून तब्बल 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या असल्या तरी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. काही प्रमाणपत्रांमधील त्रुटी आणि पडताळणीतील विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असल्याचाही त्यांनी दावा केला.

इतिहासातील कुणबी नोंदींची पडताळणी करणाऱ्या संदीप शिंदे समितीला आणखी एका वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेणे आणि आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांची भेट घेऊन आंदोलन टाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चर्चा निष्फळ ठरल्यानंतर जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली.

मराठवाड्यात या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून जालना जिल्ह्यात सुरक्षाही वाढवली जाणार असल्याची माहिती आहे. राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


हेही वाचा

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमध्ये पवन त्रिपाठींच्या नियुक्तीला मराठी संघटनेचा विरोध

पुढील बातमी
इतर बातम्या