मराठा मोर्चावरून शिवसेना-भाजपची बॅनरबाजी

परळ - एकीकडे मराठा मूक मोर्चा समिती आपल्या विविध मागण्या आणि हक्कासाठी रॅली, मूक मोर्चे काढतेय. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपच्या बॅनरबाजीमुळे राजकारण चांगलंच रंगलंय.

रविवारी आयोजित केलेल्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं परळमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर शनिवारी बॅनरबाजी केली होती. मोटारसायकल रॅलीच्या स्वागतासाठी शिवसेनेनं बॅनर लावले होते. मात्र रातोरात शिवसेनेच्या या बॅनरची जागा भाजपनं घेतली. त्यामुळे राजकीय पक्ष मराठा मूक मोर्चाला पाठींबा देतायेत की येत्या निवडणुकीत मत मिळवण्यासाठी राजकीय पक्षाची खेळी सुरेय? हे प्रश्न उपस्थित होतायेत.

"मी स्वतः एक मराठा असल्यामुळे या मराठा रॅलीला पाठींबा दिला. यापुढेही हा पाठिंबा असाच राहील. मात्र शिवसेनेला बॅकफूटवर टाकण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. सध्या सरकार त्यांचंच आहे. त्यामुळे मुद्दाम हे बॅनर श्रेय घेण्यासाठी काढले आहेत," असा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केला.

"मोकळी जागा मिळाली तिथं हे बॅनर लावण्यात आलेत. आम्ही कोणत्याही पक्षाचे बॅनर काढून भाजपचे बॅनर लावलेले नाहीत. खुद्द मराठा रॅलीला मुख्यमंत्री फडणवीस यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे इतक्या दुय्यम दर्जाच राजकारण करण्याची गरज नाही," असं भाजपचे शिवडी विधानसभेचे मिडिया प्रमुख ब्रम्हदेव अत्कारी यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या