11 एप्रिलला मुंबईत महाविकास आघाडीकडून मशाल मोर्चा

मुंबईत महाविकास आघाडीकडून मशाल मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी काँग्रेसकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या बैठकीत मशाल मोर्चावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय.

येत्या ११ एप्रिलला माहीम ते चैत्यभूमी परिसर असा मशाल मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या मोर्चात महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर दिल्लीत सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्याच धर्तीवर मुंबईतही विरोधकांनी एकत्र येण्यासाठी मुंबई काँग्रेसने बुधवारी विशेष बैठकीचे आयोजन मुंबई मराठी पत्रकार संघात केले होते. या बैठकीत मशाल मोर्चावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

त्याशिवाय येत्या काळात इतरही अनेक आंदोलने हाती घेण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या बैठकीला काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, भूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव, नरेंद्र राणे, तुषार गांधी यांच्यासह विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते. १२ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, २५ सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले.


हेही वाचा

माझ्या हत्येसाठी उद्धव ठाकरेंचा सुपारी देण्याचा प्रयत्न, नारायण राणेंचा मोठा आरोप

सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार, राज्य सरकारचा निर्णय

पुढील बातमी
इतर बातम्या