मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आता पारदर्शक काचेने बंदिस्त करणार

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आता पारदर्शक अशा काचेने बंदिस्त करण्यात येणार आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे.

दादर येथील शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर बुधवारी सकाळी काही समाज कंटकांनी लाल रंग फेकल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली होती.

सकाळीच मोठ्या संख्येने सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी, कार्यकर्ते एक एक करून जमू लागले होते. या घटनेमुळे या परिसरात काही काळ तणाव पसरला होता.

समाजकंटकांनी बुधवारी पुतळ्यावर मोठ्या प्रमाणात लाल रंगाचा ऑईल पेंट टाकला होता. हा रंग काढण्यासाठी तब्बल चार लिटर थिनर वापरण्यात आले. शाखाप्रमुख अजित कदम आणि माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे यांच्यासह शिवसैनिकांनी हा रंग घासूनपुसून काढून टाकला.

पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री या प्रकरणी एका आरोपीला अटकही केली. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आता या पुतळ्याला काचेच्या तावदानाचे आवरण लावून बंदिस्त करण्याचा निर्णय शिवसेनेने (ठाकरे) घेतला आहे.

सुमारे 18 वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती. तेव्हाही मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांनी काळे फासले होते. अशा घटना वारंवार घडू नये म्हणून शिवसेनेने (ठाकरे) पुतळा बंदिस्त करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

पुतळ्याला विशिष्ट अशा न तुटणाऱ्या (अनब्रेकेबल) पारदर्शक काचेने बंदिस्त केले जाणार आहे. या पुतळ्याला असे आवरण बसवण्यात येणार होतेच. पण ही घटना घडल्यामुळे हे काम आता तातडीने हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी गुरुवारी पुतळ्याच्या आजूबाजूने छतही घालण्यात आले आहे.


हेही वाचा

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला रंग लावल्याप्रकरणी एकाला अटक

शिवाजी महाराजांचा 'अनादर' केल्याबद्दल काँग्रेसची फडणवीसांवर टीका

पुढील बातमी
इतर बातम्या