मनसे अध्यक्ष राज ठाकरे झाले आजोबा, कुटुंबात चिमुकल्याचे आगमन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. कारण त्यांच्या कुटुंबात चिमुकल्याचं आगमन झालं आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली अमित ठाकरे हे आई-बाबा झाले आहेत. तर राज ठाकरे आजोबा झाले आहेत. 

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी सध्या या नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरू असल्याचं समजत आहे. एप्रिल महिन्यात ठाकरे कुटुंबातील पुढच्या पिढीतील पाहुण्याचे आमगन होणार होते. त्यानुसार राज ठाकरे कुटुंबात चिमुकल्याचं आगमन झालं आहे. 

काही महिन्यांपूर्वीच राज हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरून सहकुटुंब ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी शिफ्ट झाले. याच नवीन घरामध्ये आता ही चिमुकली पावलं खेळताना बागडताना दिसणार आहेत.

अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला. अमित यांच्या लग्नाला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसंच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोअर परळ इथल्या सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता.

२०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात अमित आणि मिताली यांचा साखरपुडा पार पडला होता. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. मिताली यांचे वडील संजय बोरुडे हे प्रसिद्ध सर्जन आहेत.

राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता. अमित आणि मिताली यांची ओळख जुनी आहे. याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आणि नंतर दोघंही विवाहबंधनात अडकले होते.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अमित ठाकरे यांच्या खांद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची धुरा देण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती.


पुढील बातमी
इतर बातम्या