सध्या केवळ महाराष्ट्रातलंच नाही, तर संपूर्ण देशात, जगात कोरोनाचं (coronavirus) संकट गहिरं झालं आहे. कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने सरकारची चिंताही वाढू लागली आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाटी प्रशासकीय पातळीवर सर्व प्रकारचे उपाय केले जात आहेत. जनतेला घरी राहण्याचं आवाहन केलं जात आहे. त्यातच राज्यात गुढी पाडवा (gudhi padwa) असल्याने नवीन मराठी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे (MNS chief raj thackeray) यांनी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सजग राहण्याचं आवाहन केलं होतं. कोरोना आधीच मागे लागलाय. त्यामुळे हात जोडून विनंती आहे की प्रकरण सहज घेऊ नका. घरात बसा. कारण हे सगळं आपल्यासाठीच सुरू आहे. सरकारलाही कदाचित माहीत नसेल की आकडा नेमका किती असेल. घरी बसलो की बाहेरचे रुग्ण शोधणं सरकारलाही सोपं जाईल. डॉक्टर, जीवावर उदार होऊन बाहेर आहेत. डॉक्टर, पोलीस यांनाही परिवार आहे. त्यामुळे त्यांच्याशी हुज्जत घालू नका. हातावरच्या पोटाच्या लोकांनाही थोडी कळ सोसावी लागेल. सध्या आपण कोरोना विषाणूशी लढा देत आहोत, ते सुद्ध एकप्रकारचं युद्धच आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.
त्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावरून जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'वसुधैव कुटुम्बकम' अर्थात वैश्विक कुटुंबाच्या ह्या काळात संपूर्ण जग एकत्रितपणे एका संकटाशी झुंज देत आहे. ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी कमी होत सर्वत्र पुन्हा एकदा आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो, हीच सदिच्छा. अशा शब्दांत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.