मनसे आमदाराच्या ७५ लाखांच्या स्पोर्ट्स कारचा चक्काचूर, भीषण अपघातात ड्रायव्हर थोडक्यात वाचला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांच्या कारला बुधवारी रात्री डोंबिवलीत भीषण अपघात झाला. सुदैवाने राजू पाटील या कारमध्ये नव्हते. तर पाटील यांचा ड्रायव्हर या अपघातातून थोडक्यात वाचला. मात्र त्यांच्या महागड्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. 

राजू पाटील यांच्याकडे मस्टँग कंपनीची आलिशान स्पोर्ट्स कार असून या कारची किंमत ७५ लाख रुपये इतकी आहे. बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास या कारचा ड्रायव्हर पेट्रोल भरून येत असताना डोंबिवलीतील पलावा सिटीजवळच्या रेल्वे पुलाजवळ ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेगात असलेली ही कार खालच्या कोकण रेल्वेच्या रुळांवर जाऊन कोसळली. 

सुदैवाने ड्रायव्हरने कारमधून वेळीच उडी मारल्याने तो या अपघातातून थोडक्यात बचावला. मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील सध्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये आहेत. पाटील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.

पुढील बातमी
इतर बातम्या