मनसेच्या नेत्यांचा बेकायदा लोकल प्रवास.!

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लोकल प्रवास करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लोकल प्रवास केला आहे. संदीप देशपांडे यांच्यासोबत आणखी काही कार्यकर्त्यांनी लोकल प्रवास केला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ठिक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत. याआधी अनेक मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. मात्र तरीही मनसे आंदोलनावर ठाम आहे. सर्व सामान्य लोकांना रेल्वेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी होणाऱ्या आंदोलनाआधी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

जर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी ५ हून अधिक माणसं दिसल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे यात नमूद करण्यात आले आहे. कलम १४९ आणि १४४ प्रमाणे मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था भंग केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असेही यात स्पष्ट करण्यात आलं आहे.

'नोटीस आली तरी आंदोलन हे केलं जाणार, मुंबईत शिवसेनेचा आंदोलनाला परवानगी मिळते. मग मनसेच्या आंदोलनाला नोटीस का? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. आमचं आंदोलन हे सर्वसामान्यांसाठी आहे, गेले अनेक दिवस लोकल सेवा बंद आहे. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. मनसेचे आंदोलन हे होणारच, कंगना विरोधातील आंदोलनाला शिवसेना परवानगी फक्त मनसेच्या आंदोलनाला नोटीस दिली जाते', असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या