राज ठाकरेंना ईडीची नोटीस, मनसेचा ‘ठाणे बंद’चा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी नोटीस बजावली आहे. ही नोटीस राजकीय सूडबुद्धीने पाठवल्याचा दावा करत मनसेने त्याविरोधात २२ आॅगस्ट रोजी ठाणे बंदचा इशारा दिला आहे. 

ईडीने बजावलेल्या नोटिशीनुसार राज यांना ईडीच्या कार्यालयात २२ आॅगस्ट रोजी चोकशीसाठी हजर व्हायचं आहे. याच दिवशी मनसेने ठाण्यात बंदची हाक दिल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.  

ईव्हीएमविरोधाचा राग

राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित करत ईव्हीएमविरोधात जनआंदोलन छेडल्याच्या रागातून राज यांना ईडीची नोटीस पाठवली आहे. सरकारच्या या भूमिकेचा बंद पाळून निषेध करणार असल्याचं मनसेनं स्पष्ट केलं आहे.  

तर, सरकार जबाबदार

राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सरकार सूडाच्या भावनेतून राज यांच्यापाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावत आहे. त्यामुळे मनसेने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. २२ तारखेला ठाण्यात जे घडेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.  

याआधी, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली.  राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षासह सर्वच विरोधी पक्ष राज यांच्या पाठिशी आहेत, असं त्या म्हणाल्या.  


हेही वाचा-

अशा नोटिशींना मनसे भीक घालत नाही- संदीप देशपांडे

राज यांना पाठवलेली ईडीची नोटीस सूडबुद्धीनेच- बाळासाहेब थोरात


पुढील बातमी
इतर बातम्या