पाकिस्तानी हॅकर्सनी केली खासदार गोपाळ शेट्टी यांची वेबसाईट हॅक!

उत्तर मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांची वेबसाईट पाकिस्तानी हॅकर्सकडून हॅक करण्यात आली आहे. हॅकर्सनी वेबसाईट हॅक केल्यानंतर त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द देखील वापरण्यात आले आहेत. 

याप्रकरणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. मागील काही दिवसांपासून गोपाळ शेट्टी सातत्याने आपल्या मतदारसंघातील लोकांच्या भेटीगाठी घेत होते. सोबतच जम्मू काश्मीरमध्ये सीमेपलिकडून होत असलेल्या दहशतवादी कारवायांविरोधात देखील गोपाळ शेट्टी आवाज उठवत होते. 

एखाद्या खासदाराची वेबसाईट हॅक होण्याची ही घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. या आधी देखील पाकिस्तानी हॅकर्सने गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांची वेबसाईट हॅक केली होती.

गोपाळ शेट्टी यांची वेबसाईट हॅक केल्यानंतर हॅकर्सनी पाकिस्तान जिंदाबाद, अशी घोषणाबाजी त्यावर लिहिली आहे. तसंच पंतप्रधानांना उद्देशून अपशब्द देखील वापरण्यात आले आहेत. तसंच कॅच मी इफ यू कॅन अशा मेल आयडीवरून आव्हान देखील देण्यात आलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या