महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम अनिवार्य करा- भाजप

भारतीय जनता पक्षानं म्हटलं आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिके तर्फे (BMC) चालवल्या जाणाऱ्या सर्व शाळांमध्ये वंदे मातरम् गाणं अनिवार्य केलं पाहिजे.

पालिकेच्या वैधानिक समितीची बैठक सुरू असताना वंदे मातरमचे पठण करावे, अशी मागणी भाजपनं केली आहे. पालिकेनं हा प्रस्ताव मंजूर न केल्यास आपण निषेध आंदोलन करणार असल्याचं पक्षानं म्हटलं आहे. भाजपनं असा आरोप केला आहे की, शिवसेना या प्रस्तावावर आपले सध्याचे मित्रपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे समाधान करण्यासाठी गांभीर्याने विचार करीत नाही.

भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे म्हणाले, “१० ऑगस्ट २०१९ पासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे. जेव्हा भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी पहिल्यांदा हा प्रस्ताव मांडला होता. पालिका आयुक्तांनी आपले म्हणणे मांडले आणि ते सर्वसाधारण सभेकडे मान्यतेसाठी पाठवले. परंतु जानेवारी २०२० मध्ये जेव्हा हा प्रस्ताव महासभेसमोर आणला गेला, तेव्हा महापौरांनी तो स्वीकारला नाही.”

शिंदे यांनी बुधवारी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र पाठवून या प्रस्तावाला त्वरित मान्यता देण्याची मागणी केली आहे. नगरसेवक संदीप पटेल यांनी तब्बल तीन वेळा हा प्रस्ताव मांडला होता. शिंदे यांनी १८  जानेवारीला होणाऱ्या पुढील नागरी महासभेच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जावा अशी मागणी केली.

यापूर्वी भाजपने शिवसेनेवर हिंदुत्वाच्या भूमिकेचा पाठपुरावा केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या माजी आघाडीतील भागीदाराविरोधात प्रत्युत्तर दिलं.


पुढील बातमी
इतर बातम्या