बोरिवली मतदारसंघातून संजय उपाध्याय यांना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी आणखी 25 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मुंबईतील बोरिवली मतदारसंघातून पक्षाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपने बोरिवली मतदारसंघातून संजय उपाध्याय यांना संधी देऊन धक्कातंत्राचा वापर केला आहे. या मतदारसंघात सुनील राणे हे विद्यमान आमदार आहेत. पण त्यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. सुनील राणे यांचं तिकीट कापलं जाईल, अशी याआधीच चर्चा होती. त्यांच्याऐवजी भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती.

लोकसभा निवडणुकीवेळी गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्याने नाराज झालेल्या शेट्टी यांना खुश करण्यासाठी भाजप त्यांना बोरिवली विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देईल, अशी चर्चा होती. पण भाजपने गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न देता धक्कातंत्राचा अवलंब करत संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली.

बोरिवली मतदारसंघात गेल्या काही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने अशाप्रकारे धक्कातंत्राचा वापर केला आहे. बोरिवलीत गेल्या विधानसभा निवडणुकीत सुनील राणे यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन भाजपचे मंत्री विनोद तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं होतं.

विशेष म्हणजे विनोद तावडे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 1 लाख मतांच्या फरकाने जिंकून आले होते. पण भाजपने पुढच्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापलं होतं. यानंतर आता सुनील राणे यांचंदेखील तिकीट कापून संजय उपाध्याय यांना संधी देण्यात आली आहे.

संजय उपाध्याय यांना याआधी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत संधी देण्यात आली होती. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या रिक्त झालेल्या जागेवर संजय उपाध्याय यांना पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यात आली होती.

संजय उपाध्याय यांचं मुंबईत पक्षासाठी मोठं काम आहे. त्यांचे वडील देखील कित्येक वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहेत. त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. तसेच संजय उपाध्याय हे देखील लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करत आहेत.


हेही वाचा

माहिममधून अर्ज भरण्यावर सदा सरवणकर ठाम

बोरिवली मतदारसंघातून संजय उपाध्याय यांना उमेदवारी

पुढील बातमी
इतर बातम्या