पकोडा आंदोलनाचा सरकारला धसका, गिरगाव चौपाटीला अडवली निरूपम यांची गाडी

तरुणांनी बेरोजगार राहण्यापेक्षा भजी अर्थात 'पकोडे' विकणं चांगलं आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. या वक्तव्याची पाठराखण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतीच केली. त्याचा निषेध करण्यासाठी मंत्रालयासमोर भजी (पकोडे) विकण्याचे स्टॉल सुरु करून अनोखं आंदोलन करण्याचं काँग्रेसनं ठरवलं. मात्र पोलिसांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांची गाडी गिरगाव चौपाटी जवळ अडवत, हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे, तर मंत्रालय परिसरात हे आंदोलन होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी निरूपम यांना रस्त्यात 'असं' अडवलं

नरीमन पाॅईंटला ट्रॅफीक जाम

पोलिसांनी निरूपम यांना अडवण्यासाठी मोठा फौजफाटा नरीमन पाॅईंटवर तैनात केला होता. ठिकठिकाणी बॅरीकेड्स टाकून वाहनांची गती कमी करण्यात आली हाेती. परिणामी मंत्रालयाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफीक जाम झालं. यामुळे इतर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी तर दहशतवादी पकडले गेल्याचीही अफवा पसरली होती.

बेरोजगारांची थट्टा

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईतील बेरोजगार तरुणांना आवाहन केलं होतं की, त्यांनी लवकरात लवकर भजी (पकोडे) विकण्याचे स्टॉल मंत्रालयाबाहेर टाकावे. हे बेरोजगार तरूण पदवी प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रती सोबत घेऊन हे आंदोलन करणार होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारावर आणि परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

हे सरकार बेरोजगार तरुणांची थट्टा करत असून त्याविरोधात हे आंदोलन आम्ही छेडलं असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलं.

सरकार आमच्या आंदोलनाला इतकं घाबरलं आहे की त्यांनी मला गिरगावतच अडवून धरत मंत्रालय परिसरात जाण्यापासून रोखलं आहे. भलेही आज हे आंदोलन होऊ शकलं नसलं, तरी लवकरच मुंबई काँग्रेसतर्फे मोठं आंदोलन उभारलं जाईल. सरकारला इतकीच भीती वाटत असेल तर त्यांनी रोजगारनिर्मिती करावी आणि तरूणांना नोकऱ्या द्याव्यात, पकोडे विकण्याचे सल्ले देऊ नयेत.

- संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस

पुढील बातमी
इतर बातम्या