अध्यादेश आल्यानंतरच लाल दिवा काढेन - महापौर

देशभरातील मंत्र्यांच्या गाड्यांवरील लाल दिवा येत्या 1 मेपासून लावण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बंदी घातली आहे. मात्र, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी लाल दिवा काढण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतरच आपण गाडीवरील लाल दिवा काढू अशी स्पष्ट भूमिकाच महापौरांनी घेतली आहे. 

सुनिल प्रभू महापौर असताना महापौरांचा लाल दिवा काढण्याचे निर्देश सरकारने दिले होते. परंतु त्यानंतर प्रभू यांनी याबाबत सरकारला पत्र लिहून हा महापौरांचा लाल दिवा कायम ठेवावा अशी सूचना केली होती. परंतु सरकारचा आदेश येईपर्यंत सुनिल प्रभू यांनी आपली लाल दिव्याची गाडी वापरणे कायम ठेवले होते. परंतु आता पुन्हा एकदा महापौरांच्या गाडीवरील लाल दिव्यावर टाच आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना महापौरांनी याबाबत आपले सडेतोड मत व्यक्त केले. ते म्हणाले, केंद्रीय कॅबिनेटचा निर्णय सर्वांनीच मान्य करायला हवा, मात्र त्यासाठी राज्य सरकारने तसा अध्यादेश प्रसिद्ध केला पाहिजे. मागे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सगळ्या भाजपाच्या खासदारांना त्यांची संपत्ती जाहीर करण्याचे आवाहन केले होते. मात्र किती खासदारांनी संपत्ती जाहीर केली असा प्रश्न करत महाडेश्वर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या