अहमद पटेल यांच्या भेटीसाठी नारायण राणे दिल्लीला रवाना

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांना दिल्लीला बोलावले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल आणि काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी नाराज नारायण राणे यांना दिल्लीमध्ये बैठकीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी अहमद पटेल आणि नारायण राणे यांची भेट संध्याकाळी सात वाजता होणार आहे. त्यामुळे या भेटीसाठी नारायण राणे दिल्लीला रवाना झाले आहेत. पण नारायण राणे भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची नारायण राणे यांनी भेट घेतली होती. मात्र राहुल गांधी यांच्या भेटीनंतर कोणत्याही प्रकारे समाधान झाले नाही, अशी खंतही नारायण राणे यांनी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. मात्र या बैठकीला जातानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतरही नारायण राणे यांनी भेट घेतलीच नसल्याचे म्हणत खासगी कामांसाठी अहमदाबादला गेलो असल्याचे त्यांनी सांगितले.

नारायण राणे यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी मंत्री नसीम खान यांनीही भेट घेतली होती, मात्र नारायण राणे यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता.

शुक्रवारी एका मराठी वृत्तपत्रामध्ये नारायण राणेंनी शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी संपर्क केला होता अशी माहिती दिली होती. त्याचे खंडन नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले. या वृत्तपत्राने याबाबत वांद्रेचे साहेब आणि त्यांच्या पीएला विचारावे असे ट्विट केले आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या