कारला आग लागल्यानं राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्षाचा होरपळून मृत्यू

(Image used for representation)
(Image used for representation)

धावत्या कारला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यानं राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्षाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव टोल प्लाझा लगत साकोरे फाटा इथं धावत्या कारला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यानं संजय चंद्रभान शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला. शिंदे हे राष्ट्रवादीचे तालुका उपाअध्यक्ष असून त्यांच्या पत्नी निर्मला यांची दोनच महिन्यापूर्वी उपसरपंचपदी निवड झाली होती.

शिंदे आपल्या घरून द्राक्ष बागेच्या फवारणीसाठी लागणारी औषधे घेण्यासाठी कारनं (एमएच 15, एफएन 4177) पिंपळगाव इथं जात असताना हा अपघात घडला. धावत्या कारमध्ये शॉर्टसर्किटमुळे वायरिंग जळाल्यानं वाहनानं पेट घेतला. त्यानंतर कारचे दरवाजे आणि काचा लॉक झाल्या.

कारमध्ये सॅनिटायझरच्या बाटलीसह डिझेल टाकी आणि लेदर सीट कव्हर अशा ज्वलनशील वस्तू असल्यानं आगीची तीव्रता आणखी वाढली. धुराचे लोट बाहेर पडू लागल्यानंतर शिंदे यांनी दरवाजे उघडण्याचा आणि काच फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे प्रयत्न विफल ठरल्यामुळे त्यांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला.


पुढील बातमी
इतर बातम्या