अखेर दिलजमाई

मुंबई - नवरा-बायकोमध्ये व्हावेत तसेच रुसवे-फुगवे सध्या शिवसेना-भाजपा युतीत पाहायला मिळतात. कधी मानपानावरून तर कधी राजकीय मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये तु-तु, मै-मै सुरू असतेच. या वेळी मात्र कळीचा मुद्दा ठरला तो शिवस्मारकाचा. जर सन्मानपूर्वक निमंत्रण दिलं तरच शिवस्मारकाच्या भूमीपूजनाला जाणार असा पवित्रा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये नाराजी असल्याच्या चर्चांना पुन्हा पेव फुटले. पण यावर भाजपानं उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांच्यावर सोपवली. बुधवारी सकाळीच चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवस्मारकाच्या भूमिपुजनाचं आमंत्रण दिलं आणि उद्धव यांनी ते स्वीकारलंही.

एवढं असलं तरी शिवसेना - भाजपात सारं काही आलबेल असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. भाजपा आणि शिवसेनेत कधी अंतर नव्हते. त्यामुळे दिलजमाई करण्याचा प्रश्नच येत नसल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.

दिलजमाई झाली, आता शिवस्मारकाचा सोहळाही पार पडणार. पण पालिका निवडणुकीच्या धर्तीवर शिवसेना-भाजपामध्ये नाराजी आणि दिलजमाईचा खेळ असाच सुरू राहिल अशीच चर्चा आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या