मंत्रालयात पुन्हा आत्महत्या, विरोधकांचे सरकारला खडे बोल

मंत्रालयात आणखी एका व्यक्तीने आत्महत्या केल्याने सामान्य नागरिकांसोबत विरोधकांनीही सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. लोक मंत्रालयात येवून आत्महत्या करत आहेत, याचा अर्थ हे सरकार जनतेला न्याय देवू शकत नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

अधिकारी निर्णय घेत नाहीत - नवाब मलिक

आधी धर्मा पाटील यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली, त्यानंतर एका तरुणाने स्वत:वर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हर्षल रावते (३०) या तरुणाने मंत्रालयात येवून इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. ही गंभीर परिस्थिती आहे. सरकार लोकांना न्याय देवू शकत नाही. मंत्री सगळे अधिकार आपल्याकडे ठेवत आहेत आणि अधिकारी निर्णय घेत नाहीत. सरकारने वेळीच जागे झालं पाहिजे, अन्यथा ही परिस्थिती चिघळू शकते असा इशाराही मलिक यांनी दिला आहे.

सरकारनं आत्मपरीक्षण करावं - राधाकृष्ण विखे पाटील

मंत्रालायत आणखी एक आत्महत्या झाली. ही आत्महत्या आहे की अपघात हे चौकशीतून सिद्ध होईलच. मात्र सामान्य लोकांना मंत्रालयात येऊन असे पाऊल का उचलावे लागतेय, असा सवाल विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी केलाय. सरकारने याबाबत आत्मपरीक्षण करायला हवं असं त्यांनी म्हटलंय.

पुढील बातमी
इतर बातम्या