'प्रशांत परिचारक यांना निलंबित करा'

मुंबई - विधानपरिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी काढलेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर परिचारक यांना तात्काळ निलंबित करावं, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. 

आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेले वक्तव्य कोणत्या पठडीमध्ये बसते हे राज्य सरकारने सांगावे असं म्हणत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी सरकारवर जोरदार टीका केली. परिचारक यांचे हे वक्तव्य एक प्रकारे देशद्रोहपणा नाही का? राज्य सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही योग्य आयुधं नक्की वापरू असंही त्यांनी सांगितले. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली नाही तर सभागृह चालू देणार नाही असा इशारा दिला आहे.


'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर या आमदाराला फासावर लटकवा, असंच म्हणाले असते,' असं सांगत शिवसेनेच्या विधानपरिषदेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या