आमिर खानच्या जाहिरातीवर विरोधी पक्षांचा आक्षेप

मुंबई - काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांनी मंगळवारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या मुंबई फर्स्ट या सामाजिक संस्थेच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. या जाहिरातीमध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा फोटो असून पारदर्शक आणि बदल या मुद्द्यांना ठळक प्रसिद्धी देण्यात आली आहे. ही जाहिरात मुंबईतील जवळ-जवळ सर्व वृत्तपत्रांत छापण्यात आली आहे. भाजपाने पारदर्शक आणि बदल या मुद्द्यांना घेऊन प्रचारासाठी वापर केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मुंबई फर्स्ट या संस्थेचा संबध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असल्याचा दावाही या विरोधी पक्षांनी केला आहे. या जाहिरातीच्या विरोधात काँग्रेस आणि इतर पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. भाजपाने निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केला असून निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तर यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून, आयोग शहानिशा करून योग्य कारवाई करणार असल्याचं भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या