पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील सर्व राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात फटका बसल्याने महायुतीने आतापासूनच कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीने विधानसभा निवडवणुकीचं रणशिंग फुकण्यासाठी जुलै महिन्याचा मुहूर्त साधला आहे. याचदरम्यान, जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विविध प्रस्तावित विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच दौरा असणार आहे. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रस्तावित गोरेगाव मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन होणार आहे.

मुंबईत हजारो कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुती विधानसभेचं रणशिंग देखील फुंकणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी 6,300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रस्तावित 1,170 कोटी रुपयांच्या ऑरेंज गेट ते ग्रँट रोड उन्नत मार्गाच्या प्रकल्पाचंही भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबई महापालिकेच्या विविध प्रस्तावित प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे. यामध्ये रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया सुविधांचाही यात सामावेश आहे.


हेही वाचा

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या विरोधात पक्षातच वाढती खदखद

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात

पुढील बातमी
इतर बातम्या