मुंबईकरांना मिळणार खड्डेमुक्तीचे दिवाळी गिफ्ट

मुंबई – खड्डेमुक्तीसाठी महापालिका प्रशासनाकडून तारीख पे तारीख सुरू आहे. यात आता आणखी एका नव्या तारखेची भर यात पडली आहे. नव्या तारखेनुसार दिवाळीपर्यंत मुंबई खड्डेमुक्त करू, असे आश्वासन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सोमवारी दिले. मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी 11 वाजता मनसेच्या नगरसेवकांनी पालिका मुख्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी मसनेच्या शालिनी ठाकरे, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकर, दिलीप लांडे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली, त्यावेळी हे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, "पालिकेकडून डेडलाईन पाळली जात नसल्याने दिवाळीपर्यंत मुंबई खड्डेमुक्त झाली नाही तर दिवाळीत अधिकार्यांच्या घरात फटाके फोडू", असा इशारा मनसेने दिला आहे. "खड्ड्यांसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही मनसेकडून करण्यात आली असून, या मागणीवरही अतिरिक्त आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली आहे", असे नितीन सरदेसाई यांनी सांगितले. नगरसेवकांच्या अटकेविरोधात मनसेने जोरदार आंदोलन सुरू केले. खड्डे बुजत नाहीत, अभियंत्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत जामिन घेणार नाही अशी ठाम भूमिका घेणाऱ्या मनसेने या भेटीनंतर मात्र भूमिका बदलत जामीन घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे डेडलाईन आणि आश्वासनच हवे होते तर मनसेने इतके दिवस खड्डयावरून राजकारण का केले, अशी चर्चा यानिमित्ताने पालिकेत सुरू होती.

पुढील बातमी
इतर बातम्या