राज ठाकरेंकडून मनसेच्या बहुतांश अंगिकृत संघटना बरखास्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थी सेना आणि महिला सेना वगळता सर्व अंगिकृत संघटनांची पदं बरखास्त केली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, रस्ते व आस्थापना, जनहित कक्ष, रोजगार आणि स्वयं रोजगार, जनाधिकार सेना, लॉटरी विक्रेता सेना, कामगार सेना अशा राज्यातील सर्व संघटनांच्या पदाधिका-यांची पदे राज यांनी काढून घेतली आहेत. शुक्रवारी एक पत्रक काढून त्यांनी हे जाहीर केले आहे. तसेच बरखास्त केलेल्या पदांचा कुणीही गैरवापर केल्याचे आढळून आल्यास संबधित व्यक्तींवर पक्षांतर्गत कडक कारवाई केली जाणार असल्याचेही राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.

2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे पक्षाला आलेले अपयश तसेच पक्षांतर्गत असलेले वादविवाद ठाकरेंच्या या फतव्याला कारणीभूत असल्याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये आहे. अनेकदा मनसे कार्यकर्ते अध्यक्षांना कल्पना न देता पदाचा गैरवापर करत असल्यामुळे ही पदे बरखास्त करण्यात आली असल्याची सध्या चर्चा आहे. मनसेच्या अंगिकृत संघटनांसह पक्षातल्या विविध पदांवर आरुढ असलेल्या  पदाधिका-यांच्या कार्यपद्धतीबद्दल राज ठाकरे नाराज होते. पक्षाच्या काही जबाबदार पदाधिका-यांबद्दल राज्यभरातून कार्यकर्त्यांच्या तक्रारीही येत होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनी पक्षाचे 'नवनिर्माण' करण्याची निर्णय तातडीने अंमलात आणला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या