मनसे नेते अमित ठाकरेंची शिवसेनेवर टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे. मुंबईत अवघ्या काही महिन्यांवर महापालिका निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.

अमित ठाकरे यांच्या पुढाकारानं मनसेकडून राज्यातील एकूण ४० समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यासंदर्भात अमित ठाकरे यांनी जनतेला आवाहन करून मोहिमेत सहभागी होण्याची देखील विनंती केली होती.

यासंदर्भात एबीपी माझाशी बोलताना अमित ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिकेमध्ये गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

''अमित ठाकरे यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारकडून अपेक्षा ठेवता येणार नसल्याचं सांगितलं. समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाच्या बाबतीत कसं काम होणार? किनारे बघितले तर लक्षात येईल. आपला समुद्रकिनारा आहे. आपणच साफ ठेवायला हवा. कारण सरकारकडून अपेक्षा ठेवून चालणार नाही. सरकारकडे जबाबदारी देऊन आपण बघितलंय काय होत'', असं त्यांनी म्हटलं.

समुद्रकिनाऱ्यांच्या अस्वच्छतेबाबत विचारणा केली असता अमित ठाकरे यांनी यासाठी इच्छाशक्ती लागते. गेली २५ वर्ष त्यांच्याकडे महापालिकेची सत्ता आहे, सरकार आहे. पण त्यांच्याकडे दुर्दैवाने इच्छाशक्ती नाही. त्यामुळे या गोष्टी झालेल्या नाहीत.

''त्यांच्याकडे महापालिका गेली २५ वर्ष आहे. त्यांनी यंत्रणा व्यवस्थित राबवली असती, तर दुसऱ्या कुणालाही बीच साफसफाईची गरज लागली नसती. आधी तुमच्या शहरांवर, राज्यावर तुम्हाला प्रेम असायला हवं. कुणी सांगून ते निर्माण होत नाही", असं देखील अमित ठाकरे म्हणाले.

आरेचं जंगल शिवसेनेमुळे वाचलं नसून लोकांमुळे वाचल्याचं अमित ठाकरेंनी नमूद केलं. “आरे लोकांमुळे वाचलंय. लोकं रस्त्यावर उतरली, त्यांनी विरोध केला त्यामुळे आरेचं जंगल वाचलं”, असं ते म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या