राणेंचा शिवसेनेला 'हात'

मुंबई - राजकारणात कुणी कायमस्वरुपी मित्र किंवा शत्रू नसतो. घासून घासून गुळगुळीत झालेला हा राजकीय सिद्धांत मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालाच्या नंतर नव्याने सिद्ध होऊ पाहतोय. जुने मित्र शत्रू झाले आहेत. जुने शत्रू मैत्रीचा हात पुढे करण्याच्या तयारीत आहेत. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपाला साथ देण्यापेक्षा शिवसेनेशी हातमिळवणी करण्याकडे ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचा कल आहे. अर्थात याही बाबतीत मतभेद आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेता गुरुदास कामत यांनी, ”काँग्रेसने शिवसेनेला समर्थन दिल्यास तो जनतेचा विश्वासघात ठरेल,’’ अशा आशयाची प्रतिक्रिया दिली आहे. तर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सध्या नोटीस पिरीएडवर असलेल्या संजय निरुपम यांनी एक पाऊल पुढे सरकत “शिवसेनेने आमच्याकडे पाठिंबा मागितला होता पण आम्ही नकार दिला”, असा सुतळी बाँब फोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण निरुपम यांचं सध्या पक्षातलं डळमळीत झालेलं स्थान पाहता त्यांचा हा फटाका फुसका ठरण्याचीच चिन्हं जास्त आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला समर्थन देण्यासाठी काँग्रेसमधले दोन नेते अनुकूल आहेत. हे दोन नेते म्हणजे नारायण राणे आणि भाई जगताप. नारायण राणे यांचा शिवसेनेबद्दल ‘सॉफ्ट कॉर्नर’ ही बातमी सर्वसामान्यांच्या भुवया नक्कीच उंचावायला लावणारी आहे. राणे यांच्यातला जुना शिवसैनिक आणि त्यापेक्षा सतत योग्य संधीच्या शोधात असणारा राजकारणी जागा झाला, असं म्हणता येईल. राणे याबाबतीत ठाम आहेत. ते समर्थनाचा मुद्दा राज्यातील आणि केंद्रातील बड्या काँग्रेस नेत्यांच्या गळी उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवाय आता काँग्रेसचं समर्थन घेतल्यानंतर भाजपा आणि इतर पक्षांकडून शिवसेनेची कोंडी केली जाईल, हे राजकारणात मुरलेले राणे जाणून आहेत. शिवसेनेला दिलेल्या समर्थनातून जुने हिशेब चुकते करण्याची संधीही त्यांना साधायला मिळणार आहे. भाजपापेक्षा शिवसेनेला समर्थन हे काँग्रेस आणि अर्थात स्वतःच्या दीर्घकाळच्या राजकारणासाठी उपयुक्त आहे, हे त्यांनी हेरलं आहे. त्यातच राणे यांचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेना समर्थनाचे संकेतही दिले आहेत. आपल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात, “कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कधीही बरा, शिवसेनेनं मन बदलावं, मुंबई नक्की बदलेल!” शिवसेना हा दिलदार शत्रू असल्याचं मान्य करणा-या नितेश राणे यांनी शिवसेनेचं कौतुक आणि काँग्रेस प्रचाराची टॅगलाइन यांच्यात सरमिसळ घडवून आणली आहे. आपल्या आणखी एका ट्विटमध्ये नितेश राणे यांनी काही दशकांपूर्वी शिवसेनेच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे मुरली देवरा महापौर झाले होते, हा इतिहास खुबीने उगाळला. इतकं सूचक मतप्रदर्शन नितेश हे वडील नारायण राणे यांच्या सहमतीशिवाय करतील, हे पटण्यासारखं नाही.

तूर्त तरी काँग्रेसने याबाबतीत आपले पत्ते उघड केलेले नाहीत. दुसरीकडे शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी उपलब्ध पर्यायांमध्ये काँग्रेसशी ‘हात’ मिळवणीचा पर्यायही खुला ठेवला आहे. पालिकेत सर्वाधिक संख्याबळ प्राप्त करण्याचा मान जरी शिवसेनेला मिळाला तरी भाजपाला ‘औकात’ दाखवण्याचा ‘मौका’ शिवसेनेला साधता आलेला नाही. पालिकेत सत्तेचं गणित जुळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी आपापली मोटबांधणी सुरू केली आहे. सत्तास्थापनेसाठीही भाजपासोबत युती न करण्याची सर्वसामान्य शिवसैनिकांची तीव्र भावना लक्षात घेऊन महापौरपद मिळवण्यासाठी भाजपाच्या ‘दगडापेक्षा काँग्रेसची विट मऊ’ मानत काँग्रेसचं समर्थन घेण्यापूर्वी या निर्णयाच्या दूरगामी परिणामांचा विचार शिवसेना नेतृत्वाला करावा लागणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या