आक्रमक शिवसेनेमुळे भाजप बॅकफूटवर?

मुंबई - भाजपा आणि शिवसेनेमधील वाद विकोपाला पोहोचले आहेत. शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेने आपली तलवार म्यान केली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर केलेल्या कारवाईचा विरोध शिवसेनेच्या आमदारांनी केला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपा त्रस्त झाली आहे. त्यामुळे युतीतील तणाव कमी व्हावा यासाठी भाजपा पुढाकार घेत आहे. 

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर भाजपाचे दोन ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मातोश्रीवर जाऊन घेणार आहेत. शिवसेना आणि भाजपाचे संबंध जेव्हा सर्वात जास्त दुरावले तेव्हाही याच दोन मंत्र्यांनी शिवसेना-भाजपाची युती म्हणजे अमर प्रेम आहे आणि 200% युती होणार असा विश्वास व्यक्त केला होता. 

दरम्यान, शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाल्यावर दिल्लीशी सल्ला मसलत करून पुढची रणनीती तयार केली जाईल असं सांगण्यात येत आहे. गुरुवारी झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेच्या या वृत्तीमुळे मध्यवर्ती निवडणुकीवरही चर्चा झाली. भाजपाच्या संपर्कात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मिळून 29 आमदार आहेत, असा दावा भाजपाच्या सूत्रांनी केला आहे. या भेटीनंतर आणि संपर्कात असलेल्या आमदारांमुळे तयार होणारी परिस्थिती नवी दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींना काळविल्यानंतर पुढील महत्त्वपूर्ण पाऊले उचलेली जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या