काश्मीरमधील हल्ल्याचा हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध

दादरच्या कबुतरखान्यामध्ये मंगळवारी राष्ट्रद्रोही प्रवृत्तींच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 'काश्मिरमध्ये भारतीय सेनेवर आक्रमण करणार्‍यांना देशद्रोही घोषित करून त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी आणि भारतीय सेनेला विशेष अधिकार प्रदान करण्यात यावेत', अशी मागणी यावेळी करण्यात आली.

देशातील युवकांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे उघड झालेल्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक डॉ. झाकिर नाईक याची संस्था चालवायला घेणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची चौकशी व्हावी अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी झाकीर नाईकला अटक करा आणि अबू आझमीची चौकशी करा, आता एकच लक्ष हिंदूराष्ट्र अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.

'अबू आझमी यांच्या चौकशीसाठी सरकारकडे पाठपुरावा करू', असे वक्तव्य अभय वर्तक यांनी यावेळी केले. 'शाळा चालवण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी अबू आझमी यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला? हा पैसा चुकीच्या मार्गातून तर आलेला नाही ना? अशी शंका निर्माण होते. ही संस्था वादग्रस्त आणि बंदी आलेल्या संघटनेची असल्याने कोणत्याही परिस्थितीत अबू आझमींना ही संस्था चालवण्यासाठी देण्यात येऊ नये. तिचे हस्तांतरण झाल्यास ते रद्द करण्यात यावे. शासनाने ही शाळा ताब्यात घ्यावी. या प्रकरणात अबू आझमी यांच्या सखोल चौकशीसाठी आम्ही गृहखाते, विधिखाते आणि शिक्षण विभाग यांच्याकडे पाठपुरावा करू,' असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या