मुंबई - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. विविध क्षेत्रातील दिग्गजांनीही मतदान करत त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. पण, काही मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदान प्रभागाचा क्रमांक आणि मतदार यादीत नाव नसल्यामुळे अनेकांची निराशा झाली. यामध्ये शेफ संजीव कपूर, वरूण धवन, परेश रावल यांच्या सारख्या अनेकांची नावे आहेत.
अभिनेता वरुण धवनला तर मतदान न करताच परतावे लागले आहे. मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्याला मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. ‘हा सर्व प्रकार विचित्र आहे. मतदार यादीत माझे नावच नाहीये. त्यामुळे आता माझे नाव आहे तरी कुठे याची विचारणा मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे’, असे म्हणत वरुणने त्याची नाराजी व्यक्त केली आहे.