महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असुरक्षित?

हा किस्सा आहे एका लाल दिव्याच्या गाडीचा. वेळ होती गुरुवारी रात्री साडेदहाची. मुंबईच्या गरवारे क्लब हाऊसमधून एक लाल दिव्याची गाडी निघाली आणि अवघ्या 100 मीटर अंतरावर जाऊन थांबली. काही क्षणातच सिक्युरिटी कमांडो क्लबहाऊसमधून बाहेर आले आणि तत्परतेने गाडीत बसून त्यांनी ही लाल दिव्याची गाडी गाठली. ही गाडी दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नसून, ती होती प्रत्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची.

मुंबईच्या गरवारे क्लब हाऊसमध्ये भाजपाच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी सर्वांसाठी जेवणाचीही व्यवस्था होती. या कार्यक्रमाला भाजपाचे अनेक दिग्गज उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री अचानक खाली उतरले आणि त्यांच्या गाडीत बसून निघाले. इकडे त्यांच्या सुरक्षा रक्षकांना आणि इतर पदाधिकाऱ्यांना याची जणू खबरच नव्हती. हे अंतर होतं अवघ्या काही मीटर्सचं. पण या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्र्यांच्या लवाजम्याची मात्र त्रेधातिरपीट उडाली. मुख्यमंत्री निघाल्याचं लक्षात येताच सर्व सुरक्षारक्षक आणि पदाधिकारी ताबडतोब खाली उतरून गाडीत बसले आणि त्यांनी आधीच काही मीटर अंतरावर जाऊन थांबलेल्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीला गाठलं. आणि मग कुठे मुख्यमंत्री त्यांच्या नेहमीच्या लवाजम्यासह पुढच्या प्रवासाला निघाले. मात्र या प्रकारामुळे 100 मीटर का होईना, पण मुख्यमंत्री विना सुरक्षा निघाल्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकला असणार!

पुढील बातमी
इतर बातम्या