निवडणुकीत भाजपाकडून पैसा, साधनसामुग्रीचा गैरवापर - शरद पवार

नरिमन पॉइंट - पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने मोठ्या प्रमाणात साधनसामुग्री आणि पैशांचा वापर केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. भाजपाकडे इतका पैसा आला कुठून याचे उत्तर शरद पवारांनी मागितले आहे.

कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपाच्या सरकारला राष्ट्रवादी पक्ष पाठिंबा देणार नाही असे लिखित स्वरूपात राज्यपालांकडे लिहून देण्यास तयार आहे, शिवसेनेही असेच करून दाखवावे. एका बाजूला पाठिंबा काढण्याची भाषा करणारी शिवसेना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, तर बिनशर्त पाठिंबा देऊ, असे धोरण ठेवते. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा देण्याचा एक मार्ग खुला ठेवला आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. नरिमन पॉइंट इथल्या राष्ट्रवादी भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच अल्पमतात सरकार कसे चालवावे याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी मागितला नाही आणि देणारही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नोटाबंदीमुळे शेती आणि इतर उद्योग यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील प्रेमसंबध तुटले आहे. आता मध्यवधी निवडणुकांना योग्य वेळ आली आहे. राष्ट्रवादी पक्ष या परिस्थितीसाठी तयार आहे. सामनावर बंदी घालण्याच्या भाजपाच्या मागणीवर बोलताना शरद पवार यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही वृत्तपत्रावर बंदी घालण्याची मागणी चुकीची आहे, सत्तेवर असलेला पक्ष बंदी घालण्याची मागणी कशी करू शकतो. सत्ता कशा प्रकारे डोक्यात जाते याचे मोठे उदाहरण आहे. शिवसेना मुंबईत वरचढ आहे असे दिसते. भाजपा-शिवसेनेच्या भांडणाचा थोडा फायदा मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळू शकतो, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

पुढील बातमी
इतर बातम्या