'ही' शाखा कुणाची? माहीममधील शाखेवरून शिवसेना-भाजपा न्यायालयात

माहिममधील गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या शाखेच्या ताब्यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वाद रंगला असून गुरुवारी या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी थेट हातघाईवरच आले. पोलिसांना मध्यस्थी करत हा वाद मिटवला असला, तरी शिवसेनेची शाखा असलेली ही जागा कुणाची आणि याठिकाणी कोण बसणार याबाबतचा वाद आता न्यायालयात गेला आहे. न्यायालयाने दोघांनाही आपल्याकडील कागदपत्रे सादर करण्यास सांगितली असून न्यायालयाच्या निकालानंतरच शिवसेनेची शाखा कायम राहील की भाजपाचे कार्यालय होईल? हे आता न्यायालयाच्या निर्णयावरच अवलंबून असेल.

'इथे' आहे शाखा

माहीम येथील दिलीप गुप्ते मार्गाच्या आतील बाजूस पंडित गुणीदास मार्ग आणि रामभाई मोहाडिकर मार्गाच्या बरोबर मधोमध ही शिवसेनेची शाखा आहे. या शाखेवर भाजपाने आपला हक्क सांगितला असून या शाखेचा ताबा घेण्यास भाजपाच्या स्थानिक नगरसेविकासह गेलेले कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात मोठी बाचाबाची झाली. दोन्ही गट हमरीतुमरीवर आल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांनी नगरसेवकपदापासून ते आमदारपदापर्यंतचा कारभार या शाखेतूनच हाकला. परंतु महापालिका निवडणुकीपूर्वी सुरेश गंभीर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत गंभीर यांची मुलगी शीतल गंभीर-देसाई यांना भाजपाने प्रभाग १९० मधून उमेदवारी दिली. या निवडणुकीत शीतल गंभीर निवडून आल्या. मात्र, तेव्हापासून त्यांचा कार्यालयाचा शोध सुरूच आहे.

पत्नीच्या नावे जागा

सुरेश गंभीर वापरत असलेली शिवसेनेच्या शाखेची जागा त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. त्यामुळे ही जागा ताब्यात घेण्याचा निर्णय गंभीर यांनी घेतला. त्यानुसार या जागेवर सुरेश गंभीर यांचे जनसंपर्क कार्यालय अशा नावाचा फलक तिथे लावण्यात आला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी तिथे जमा झाले होते. परंतु शिवसेनेच्या शाखेच्या जागेत गंभीर यांनी स्वत: चं जनसंपर्क कार्यालय उघडल्याचं समजताच शाखाप्रमुख देवळेकर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्याठिकाणी धाव घेतली आणि त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे सकाळी काही काळ येथील वातावरण तापलं होतं.

शिवीगाळीचा प्रकार निंदनीय

शिवसेना शाखेची जागा माझ्या आईच्या नावे असल्यामुळे आम्ही ती परत घेण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु शिवसेनेचे पदाधिकारी ही जागा आपली असल्याचे सांगत आहेत. आजवर आम्ही शिवसेनेत होते, म्हणून त्या जागेचा वापर शाखा म्हणून केला होता. परंतु आता आम्ही भाजपात आहोत. शिवसेनेच्या दोन-चार लोकांकडून विरोध झाला. त्यामुळे आम्हीही कायदेशीर मार्गाने लढा लढण्याचा निर्णय घेतला असून याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने दोघांनाही आपल्याकडील कागदपत्रे सादर करण्यास सांगितली आहेत. कायदेशीर मार्गाने आम्ही ही जागा ताब्यात घेऊ. ज्याप्रकारे शिवसैनिकांनी शिवीगाळ केली, तो प्रकार निंदनीय होता.

- शीतल गंभीर, नगरसेविका, भाजपा

पुढील बातमी
इतर बातम्या