पादचारी पुलाच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपात जुंपली

लष्कराकडून उभारण्यात आलेल्या परळ ते एल्फिन्स्टन रोड, करी रोड आणि आंबिवली स्थानकातील हे तिन्ही पूल मंगळवारपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात आले. पण या पुलाच्या उद्घाटनावरून भाजपा आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली.

एल्फिस्टन येथील लष्कराने बांधलेल्या पुलांचं उद्घाटन रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पण, या कार्यक्रमात पूर्णपणे भाजपाची छाप पाहायला मिळाली. त्यामुळे शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे चांगलेच आक्रमक झाले. जाणीव पूर्वक आम्हाला टाळलं जात असल्याचा आरोप या दोघांनी  केला.

बॅनरवर फक्त भाजपाच

परळ येथील आर्मीने बांधलेल्या या पुलाच्या उद्घाटनाचा भाजपाच्यावतीने मोठा बॅनर लावल्यात आला होता. पण, या बॅनरवर स्थानिक खासदार अरविंद सावंत यांच्या नावाचा उल्लेखच नसल्याने ते चांगलेच संतापले. २३ जणांचा जीव गेल्यानंतर या सरकारला जाग आली. त्यानंतर त्यांनी आर्मीला ब्रीज बांधण्याची परवानगी दिल्याचं सांगत जसं काय हेच सगळं करतात असा आव आणून श्रेय लाटत आहेत, असाही आरोप त्यांनी केला. 

खासदार राहुल शेवाळे यांनी हा तर मेलेल्या माणसांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार असल्याचं म्हणत २३ निष्पाप बळी गेल्यानंतर यांना शहाणपण सुचलं आहे, असा आरोप केला आहे. तसंच, भाजपाच्या या असल्या वागणुकीमुळे कार्यक्रमाचे महत्त्व देखील कमी झाल्याचं शेवाळे यांनी म्हटलं.

पुढील बातमी
इतर बातम्या