'सिहांच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली' - शिवसेना

'सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. 'हम करे सो कायदा’वाल्यांसाठी हा निर्वाणीचा इशारा आहे. गुजरात निकाल हे २०१९ साली काय होणार? याची नांदी आहे', असं म्हणत शिवसेनेनं गुजरात निवडणुकीवरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. 

शिवसेनेचा भाजपाला टोला

शिवसेनेने मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपाच्या विजयाबद्दल प्रश्नचिन्ह उभं करत काँग्रेसच्या यशाकडे लक्ष वेधलं आहे. 'गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आहे. विजय होणारच होता आणि जल्लोषाचे ढोल वाजवण्याची तयारी आधीच सुरू झाली होती. पण जल्लोष करावा, बेभान होऊन नाचावे इतका देदीप्यमान विजय भारतीय जनता पक्षास खरोखरच मिळाला आहे का?, गुजरातेत भाजपाला १५० पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही, असं शेवटपर्यंत छातीठोकपणे सांगितलं गेलं. पण शंभराचाही आकडा गाठताना दमछाक उडाली' असल्याचा टोलाही शिवसेनेने लगावला.

'देशाच्या पंतप्रधानांनाही शेवटी गुजरातच्या अस्मितेचेच कार्ड खेळावं लागलं. ‘आपना माणस’ म्हणूनच ९९ मतदारसंघांतील जनता मोदी यांच्या मागे उभी राहिली. पण किमान ७७ मतदारसंघांत राहुल गांधी आणि हार्दिक पटेल जोडीचा जय झाला' असल्याचा चिमटाही शिवसेनेने काढला.

पुढील बातमी
इतर बातम्या