"केंद्राचे इशाऱ्याचे अग्निबाण फुसके", चिनी सैनिकांच्या घुसखोरीवर सामनातून आगपाखड

अरुणाचल प्रदेशातील तवांग सीमेवर ९ डिसेंबर रोजी चिनी सैनिकांनी भारताच्या सीमा भागात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. आधीच्या सरकारकडे बोट दाखवून तुम्ही पळ काढू नका, तुमची जबाबदारी तुम्हालाच स्वीकारावी लागेल, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

मोदी सरकार चीनविरोधात ‘जशास तसे’ धोरण राबवत आहे, चिनी सीमेवर हे सरकार तोडीस तोड संरक्षणसिद्धता करत असून येथील सीमाभागात पायाभूत सुविधांचे जाळे २०१४ नंतरच घट्ट विणले, असे दाखवायचे दात केंद्र सरकारची भक्त मंडळी येताजाता चमकवीत असते. मात्र, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ९ डिसेंबर रोजी रात्री जे काही घडले, त्यामुळे दाखवायच्या दातांची ‘दातखीळ’ बसली आहे. पुन्हा एकदा केंद्र सरकारचे सर्व दावे फोल ठरले आहेत, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

अग्रलेखात शिवसेनेनं म्हटलं की, “आपल्या जवानांनी गलवानप्रमाणे येथेही चिन्यांना त्यांची जागा दाखवली हे चांगलेच झाले, पण केंद्रातील सरकारचे काय? भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले तर जशास तसे उत्तर दिले जाईल, भारताची एक इंचही जमीन कोणाला गिळू देणार नाही, असे इशाऱ्यांचे ‘अग्निबाण’ सध्याचे सरकार नेहमीच बीजिंगच्या दिशेने सोडत असते. मात्र हे अग्निबाण फुसके आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यांचे नगारेही फुटके आहेत. हे ९ डिसेंबर रोजी पुन्हा सिद्ध झाले. दोन वर्षांपूर्वी गलवान खोऱ्यात जसा हल्ला चिन्यांनी भारतीय सैन्यावर केला होता तसाच हल्ला तवांगमध्येही करण्याची चिनी लष्कराची योजना होती. सुदैवाने भारतीय सैन्याने आक्रमक प्रत्युत्तर देत चिन्यांना हुसकावून लावले.”


हेही वाचा

१९ डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, सीमाप्रश्नावर मांडणार ठराव

Mumbai Local News: Yatri App 'या' महिन्याच्या अखेरीस पश्चिम रेल्वेसाठी लाँच होणार

पुढील बातमी
इतर बातम्या