माँसाहेबांबद्दल बोलणं भोवलं, नितेश राणेंविरोधात तक्रार दाखल

भाजपचे आमदार नितेश राणेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी चूकीची माहिती ट्विटरद्वारे दिली. त्यांनी केलेल्या ट्विटनंतर संतप्त शिवसैनिकांनी नितेश राणेंविरोधात तक्रार केली.

गुरुवारी रात्री मुंबईतल्या वरळी, भोईवडा, काळाचौकी आणि भायखळा पोलिस स्टेशनमध्ये स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रारीमध्ये शिवसेनेनं म्हटलं आहे की, नितेश राणेंनी ट्विट करुन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव लिहून शिवसेनेचं नाव बदलणार का? असा सवाल केला. त्यांच्या अशा बोलण्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याविषयी वक्तव्य केल्यामुळे आमच्या तीव्र भावना दुखावल्या आहेत. याबद्दल नितेश राणे यांच्यावर तातडीने कारवाई करुन एफआयआर दाखल करण्यात यावी. यासोबतच त्यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात यावे' अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नितेश राणेंनी ट्विट केले होते की,'तमाम हिंदूंच्या माँसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव बदलणार का?' या ट्विटनंतर शिवसेनेमध्ये संतापाचे वातावरण होते.

दरम्यान कंणकवली पोलिसांकडून देखील नितेश राणेंना नोटीस बजावण्यात आली आहे. स्थानिक शिवसेना पदाधिकारी संतोष परबांवर नितेश राणे समर्थकांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये गंभीर जखमी केल्या प्रकरणी, आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली.


हेही वाचा

रात्रीचा लॉकडाऊन लावण्यावर चर्चा - अजित पवार

गिरणी कामगारांना ३२० चौ.फुटांची घरे - गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

पुढील बातमी
इतर बातम्या