संपावरून राजकारण सुसाट! शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संप लांबवला-अॅड. अनिल परब

तब्बल नऊ दिवसांनंतर मुंबईच्या रस्त्यावरून बेस्ट बेस धावण्यास सुरूवात झाली असून आता बेस्ट बसने सुसाट वेग धरला आहे. तर बेस्ट बस संप यशस्वी करून दाखवणाऱ्या कामगार नेते शशांक राव यांचीच चर्चा आता सर्वत्र असून एक चांगला नवा कामगार नेता मिळाल्याचं म्हणत त्यांचं कौतुकही होत आहे. त्याचवेळी बेस्ट संपावरून आता राजकारणही सुसाट झालं आहे. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत शशांक राव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेनाला बदनाम करण्याचा प्रयत्न 

शशांक राव यांनी ९ दिवस कामगारांची डोकी भडकवण्याचं काम केल्याचा आरोप करत परब यांनी शशांक राव यांच्या माध्यमातून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठीच संप लांबण्यात आल्याचंही म्हटलं आहे. तर शशांक राव हे कामगारांची दिशाभूल करत असून ७ हजार रुपये पगारात वाढले, तर मी माझे शब्द परत घेईन असं ही ते यावेळी म्हणाले. शशांक राव यांच्यावर टीका करताना परब यांनी आशिष शेलार, कपिल पाटील आणि नारायण राणे यांच्यावरही टीका केली आहे. संप लांबवण्याच्या मागे या सर्वांचे हात होते आणि त्यातून शिवसेनेला बदनाम करणं हेच त्यांचं उद्दीष्ट होत असाही आरोप परब यांनी केला आहे.

म्हणून संपाची खेळी

परब यांनी गुरूवारी शिवसेना भवन इथं बेस्ट संपाबाबत पत्रकार परिषद घेतली. शशांक राव यांनी स्वतचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी संपाची खेळी केली. त्यांचं भाषण हे स्क्रिप्टेड होतं, ते दुसऱ्याचं कुणी तरी लिहून दिलं होतं असंही यावेळी परब म्हणाले. शिवसेना नेहमीच बेस्टच्या, बेस्ट कामगारांच्या पाठीशी असून शिवसेनेची जी भूमिका होती तीच भूमिका न्यायालयानं घेतली. बेस्ट कामगारांनी न्यायालयाच्या निकालाची प्रत व्यवस्थित वाचावी म्हणजे शशांक राव यांनी जे सांगितलं आणि न्यायालयानं जो निर्णय दिला त्यामध्ये किती तफावत आहे हे स्पष्ट होईल असं म्हणत परब यांनी शशांक रावांकडून कामगारांची फसवणूक होत असल्याचा पुनरूच्चार केला आहे. 

मातोश्रीचं स्क्रिप्ट चाललं नाही

परब यांच्या या आरोपांना शशांक राव यांनीही सडतोड उत्तर दिलं आहे. कामगारांच्या पगारात ७ हजारच नव्हे तर १७ हजार रुपयांची वाढ टप्प्याटप्यात होणार आहे. ही वाढ लवकरच दिसून येईल आणि कोण कुणाची फसवणूक करतय हे ही समजेल अशी प्रतिक्रिया शशांक राव यांनी मुंबई  लाइव्हशी बोलताना दिली आहे. संपातून एका दिवसांतच माघार घेण्याची स्क्रिप्ट मातोश्रीवर तयार झाली होती पण ती स्क्रिप्ट चाललीच नाही म्हणून आता शिवसेनेकडून असे आरोप होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. एकूणच आता बेस्ट सुसाट झाल्यानंतर बेस्ट संपावरून राजकारणही सुसाट झालंय असंच म्हणावं लागेल.


हेही वाचा -

पुन्हा 'छमछम'! मुंबईसह राज्यातील डान्स बार पुन्हा होणार सुरू

डान्स बार मालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये डिल- नवाव मलिक यांचा खळबळजनक आरोप


पुढील बातमी
इतर बातम्या