पक्ष शिवसेना, उमेदवार गुजराती

मुंबई - शिवसेना आणि भाजपातील युतीचा दोर तुटल्यानंतर कधीकाळी भाजपाच्या संस्कारात वाढलेल्या माजी नगसेवक मंगल भानूशाली यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना पक्षात घेतल्यानंतर घाटकोपर पंतनगरमधील प्रभाग 131 मधून उमेदवारी निश्चित केली. त्यानंतर या भागातील कट्टर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी याला विरोध केला. पण, कार्यकर्त्यांची समजूत काढून पुन्हा मंगल भानूशाली या उपऱ्या उमेद्वारालाच उमेदवारी देण्यात येत असल्यामुळे या भागातील शिवसैनिकांनी थेट मातोश्रीवर इ-मेल पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आणि आपण काम करणार नसल्याचं कळवलं.

प्रभाग 131 मध्ये अधिकाधिक मराठी मतदार आहेत. मराठी मतांचा टक्का अधिक असल्यामुळे खुद्द गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आपल्या मुलाला या प्रभागातून उभे न करता बाजूच्या प्रभागात उभं करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्यांनी आपल्या पक्षातील मराठी पदाधिकाऱ्याला तिकीट देण्याचा निर्णय घेतला. या प्रभागातून सेनेच्या वतीने बाबू दरेकर, प्रसाद कामतेकर, नाना उतेकरसह अन्य 3 इच्छुक होते.

पण, आयत्यावेळी पक्षात आलेल्या भानुशाली यांनाच तिकीट देण्याचा घाट घातला. म्हणून शिवसैनिकांनी त्यांची गाडी फोडून चीड व्यक्त केली. त्यामुळे याची दखल घेऊन खासदार राहुल शेवाळे, सेना सचिव आदेश बांदेकर आदींनी शाखा क्रमांक 131 ला भेट देऊन कार्यकर्त्यांची समजूत काढली. या वेळी भानुशाली यांना तिकीट न देता पक्षाचे पद देण्यात येईल, इथपर्यंत चर्चा झाली. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या आदल्या दिवशी पुन्हा भानुशाली यांनाच तिकीट देण्याचं अंतिम ठरलं असल्याची बातमी घाटकोपर पंतनगरमध्ये धडकली आणि मग सर्वच पदाधिकाऱ्यांनी इ मेलद्वारे आपली नाराजी मातोश्रीला कळवली. त्यामुळे घाटकोपर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.

पण, या अंतर्गत राजकारणात निवडणुकीपूर्वीच या भागातील शिवसेना पक्षाचे ग्रह फिरल्यामुळे बोलले जात आहे. दरम्यान, प्रकाश मेहता यांचे पंख छाटण्यासाठी भानुशाली यांना पक्षात घेतलं असल्याचं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणं आहे. भानुशाली यांच्या तिकीटाबाबत अंतिम निर्णय झालेला नसून शिवसैनिकांनी संयम पाळावा, असं आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या