नोटबंदीविरोधात काँगेसनं राबवलं स्वाक्षरी अभियान

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदी विरोधात मुंबई काँग्रेसनं गुरुवारी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांबाहेर स्वाक्षरी अभियान राबवलं. महिना उलटला तरी बँकेत पुरेशा नवीन नोटा नाहीत. रोज बँकेत जुन्या नोटा भरण्याकरता आणि काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. या नोटबंदीमुळे सामान्य आणि गरीब जनतेचे अतोनात हाल होत आहेत. या विरोधात नागरिकांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी स्वाक्षरी अभियानात मोठया संख्येनं सहभागी होण्यासाठी नागरिकांना यावेळी काँग्रेसच्यावतीनं आवाहन करण्यात आलं. चर्चगेट आणि सीएसटी रेल्वे स्थानकाबाहेर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी उपस्थिती लावली. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नोट पे चर्चासारखे चर्चात्मक आंदोलन केले. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून मुंबईतील 62 लोकल स्थानकांवर नोटबंदीच्या निर्णयाविरोधात स्वाक्षरी अभियान राबवले जात आहे. आमचे सर्व सामान्य नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी या स्वाक्षरी अभियानामध्ये सामील व्हावे आणि सरकार विरोधात आपला रोष प्रकट करावा. रागाला दाबून ठेवू नका, व्यक्त करा. दिल्लीतील जे मुजोर सरकार आहे त्यांच्यापर्यंत आपला आवाज जावा यासाठी आपण आपली स्वाक्षरी करावी, असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यावेळी म्हणाले.

यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत माजी आमदार चरणसिंग सपरा, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, जिल्हाध्यक्ष सुनील नरसाळे, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस विनोद शेखर, नगरसेविका सुषमा साळुंखे, पदाधिकारी पुरण दोशी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या