थिअऱ्यांचं राजकारण आणि जनतेलाच मुरडा!

  • स्वप्नील सावरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

मुंबई महापालिकेतील भांडुप पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर भाजपानं महापौरपद पटकावण्याचा इशारा दिला काय आणि शिवसेनेने एका रात्रीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षाचे सातपैकी सहा नगरसेवक गटवून स्वतःला सेफ केलं काय?

हे सर्व नक्की का? कशासाठी? कुणासाठी झालं? याचं राजकीय गणित सोडवण्यात अनेक तज्ज्ञ गुंतले आहेत. कुणी म्हणतंय, शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक भाजपाला दणका. तर, कुणी म्हणतंय, दोन ठाकरेंची एकत्र येऊन केलेली खेळी. आणि, कुणाचं डोकं चालतंय की, सेना-भाजपाची मिलीभगत आणि मनसेचा साफसफाया.

थिअरी कुणीही आणि कशीही मांडो. पण, जे घडलंय ते कुणी नाकारू शकत नाही. मनसेचे सहा नगरसेवक मातोश्रीच्या दारात जाऊन शिवबंधन बांधून घेतात काय आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून शेवटपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. अगदी फेसबुक पेजही थंडच राहतं. यातच सारं काही आलं!

थिअरी एक – शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक

या थिअरीमध्ये थोडा दम आहे. राज्यात लहान भाऊ ठरलेली आणि भाजपाच्या त्रासानं पिचलेली शिवसेना महापालिकेतली मोठ्या भावाची सद्दी टिकवायला हे पाऊल उचलू शकते, हे सर्वमान्य आहे. भाजपाला शह देण्यासाठी केलेली फोडाफोडी ही त्यांच्याच भाषेत दिलेलं उत्तर म्हणण्यासारखीच आहे.

थिअरी दोन – दोन ठाकरेंची खेळी

स्वतःचा पक्ष फोडून महत्त्व कमी करण्याची खेळी करण्याचा मूर्खपणा राज ठाकरे करतील असं वाटत नाही. अर्थात, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे मुंबई महापालिकेत आयुक्तांना भेटायला गेले असताना सहा नगरसेवक गैरहजर होते, अशी बातमी 'मुंबई लाइव्ह'ने दिली होती. तेव्हाच खरंतर बाळाचे पाय पाळण्यात दिसायला हवे होते. पण, तेव्हा हे कुणाच्याच लक्षात आले नाही, हेही खरंच. आणि, उद्धव ठाकरे राजना अशा पद्धतीने जवळ करतील, हेही पटत नाही. त्यामुळे ही थिअरीही बादच म्हणावी लागेल.

थिअरी तीन – भाजपा-सेनेची मिलीभगत आणि मनसेचा सफाया

ही थिअरीही अतिशयोक्तीकडे झुकणारी आहे. भाजपातील काहींनी ही जाणीवपूर्वक पसरवण्याचा प्रयत्न केला असेल तर आश्चर्य नाही. बुलेट ट्रेनची वीटही रचू देणार नाही, असा इशारा देऊन पंतप्रधान मोदींच्या स्वप्नांनाच तडा देण्याचे काम करणाऱ्या राज ठाकरेंना हा धडा म्हणता येईल. आधी भाजपाकडूनच छुपी मदत देऊन मनसेच्या संताप मोर्चाला बूस्ट देण्याची थिअरी मांडणाऱ्यांकडूनच ही नवी थिअरी पसरवली असण्याची शक्यता जास्त आहे.

अर्थात, टी-20 सामन्यासारखे थरारक वाटणारे थिअऱ्यांचे राजकारणही असेच रंगवले जाणार आहे. त्यामुळे, येत्या काळात पडद्यामागच्या विविध खेळ्यांचे प्रयोग माध्यमांतून समोर येत राहतीलच. परंतु, या सर्व प्रकाराकडे सर्वसामान्य मुंबईकर विशेषतः या सत्ताधाऱ्यांना मते देणारे मतदार हतबल होऊन पाहात राहणार आहेत. त्यामुळे खरा मुरडा जनतेच्याच पोटात येतोय. कारण अशांना निवडून दिलंय की जे सत्तेसाठी वाट्टेल ते, याच न्यायाने जगताहेत. जनतेसाठी वाट्टेल ते करणारे आपल्याला सापडणार आहेत तरी कधी? हेच कळेनासं झालंय. तोपर्यंत यांना सहन करण्याशिवाय करायचं तरी काय? कारण, 2019 शिवाय सध्या तरी कोणाकडेच पर्याय नाही, हेच खरं!

पुढील बातमी
इतर बातम्या