'आमची लेकरं बरोबरच.. त्‍यांचं कायबी चुकलेलं न्हाय'

आईच्या प्रेमाची महती सांगणारी एकापेक्षा एक गाणी..सोबत अनेक किस्‍से...कधी डोळयात पाणी..अशा आईच्या आठवणीत भारलेले सभागृह..याच व्यासपीठावरून दोघीही आई कडाडल्या, 'आमची मुलं बरोबरच आहेत'. त्यातील एक आई होती कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांची, तर दुसर्‍या राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मातोश्री.. निमित्त होते मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या मातृदिनानिमित्त 'आई' या खास कार्यक्रमाचे.

आईची गाणी आणि अनेक मान्यवरांनी आई विषयी व्यक्त केलेल्या भाव- भावना यांचा कलात्मक अविष्कार अनिल हर्डिकर यांनी आई या कार्यक्रमात केला आहे. त्याचा विशेष प्रयोग सोमवारी रंगशारदा येथे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आणि त्यांची आई गुणाबाई जानकर, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांची आई रत्नाबाई खोत यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी या दोघींना मानपत्र देऊन त्यांच्या मुलांच्या हस्‍ते गौरविण्‍यात आले. यावेळी आशिष शेलार यांची आई मीनल शेलार या देखील उपस्थित होत्‍या.

तुमची मुलं मंत्री झाल्‍यापासून बिघडली...असा आरोप काही लोक करीत आहेत, असं रत्नाबाई खोत आणि गुणाबाई जानकर यांना विचारलं असता दोघीही कडाडल्‍या. “आमची लेकरं बरोबर आहेत, त्यांचं कायबी चुकलेलं नाय! ते काही बिघडले नाहीत, ते दोघेही चांगलं काम करत आहेत”, अशी पोचपावतीही त्यांनी दिली. तर तुम्ही आईचा शेवटचा मार कधी खाल्‍ला होतात? असा प्रश्‍न दोन्ही मंत्र्यांना विचारताच दोघांनीही आपल्‍या बालपणातील अनेक आठवणींना उजाळा दिला. 

'माझी आई दोनच दिवसांपूर्वी रुसली होती आणि गावी निघून गेली होती. आजच तिला पुन्‍हा मुंबईत घेऊन आलो आहे' असे सांगत सदाभाऊंनी सभागृहात एकच हशा पिकवून दिला. सदाभाऊ शेतकरी नेते आहेत. त्‍यांना शेतीची कामे करता येतात का? असा प्रश्‍न विचारताच रत्नाबाई खोत यांनी 'शेतीची नांगरण, भांगलण सदाभाऊ करतात, शेण काढतात' असे सांगत उपस्थितांना थक्‍क करून सोडले. तर तुम्‍हाला शरद पवार साहेब आवडतात का? असा प्रश्‍न गुणाबाई जानकर यांना विचारला असता.. 'हो आवडतात की', असे ही त्‍या सांगायला विसरल्‍या नाहीत. 

'खासदार राजू शेट्टी सदाभाऊंवर नाराज आहेत या दोन लेकरांमध्‍ये कोण चुकतंय आई?' असा प्रश्‍न करताच रत्नाबाई खोत यांनी आपलं लेकरू बरोबर आहे हे पुन्‍हा एकदा ठणकावले आणि सभागृहात जोरदार टाळयांचा कडकडाट झाला. रत्नाबाई खोत आणि गुणाबाई जानकर या दोघीही बोलत्‍या झाल्‍याचे पाहून मीनल शेलार याही बोलत्‍या झाल्‍या आणि त्‍यांनी शेलार यांच्या लहानपणीच्‍या आठवणींना उजाळा दिला.


हेही वाचा

सदाभाऊ खोत 'कागदोपत्री' भाजपा सदस्य!

पुढील बातमी
इतर बातम्या