अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची आत्महत्या

अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी दुपारी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. मध्य प्रदेशमधील इंदोर येथील आश्रमात भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केली. गोळी झाडल्याबरोबर त्यांना इंदोरमधील बाॅम्बे हाॅस्पीटलमध्ये नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमुळे अध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राजकारण्यांचे मार्गदर्शक

राजकारण्यांचे अध्यात्मिक गुरू अशी भय्यूजी महाराज यांची खास ओळख होतीच. ठाकरे कुटुंबीय आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी भय्यूजी महाराज यांनी बऱ्याचदा प्रयत्न केले होते. भाजपातही त्यांना चांगला मान होता. काही दिवसांपूर्वीच त्यांना मध्य प्रदेश सरकारकडून मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता, पण त्यांनी तो नाकारला होता. 

कौटुंबिक ताणतणाव

त्याचं वर्षभरापूर्वीच दुसरं लग्न झालं होतं. अध्यात्मिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वावरत आपली वेगळी ओळख तयार करणारे भय्यूजी महाराज वर्षभरापासून अध्यात्मिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रापासून थोडे दूर होते. या मागे कौटुंबिक ताणतणाव असल्याचं म्हटलं जात आहे, पण त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याचं कारण काही अद्याप समोर आलेलं नाही.

माॅडलिंगही केली होती

भय्यूजी महाराज यांनी सीयाराम या कपड्यांच्या ब्रॅण्डसाठी माॅडलिंग केली होती. तर मुंबईत एका खासगी कंपनीत ते काम करत होते. पण या कामात मन रमत नसल्यानं त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. दरम्यान त्यांची कर्मभूमी मध्यप्रदेश असली तरी मुंबईत, महाराष्ट्रातही ते चांगलेच रमताना दिसत होते. महाराष्ट्रात जलसंधारणाचं जे काम त्यांनी केलं आहे ते अत्यंत उल्लेखनीय असल्याचं म्हटलं जातं.

पुढील बातमी
इतर बातम्या