आगीच्या ज्वाळांपासून झेंड्याला वाचवले, तरीही ७ शूरवीरांचा सरकारला विसर

२१ जून २०१२... वेळ होती दुपारी २ वाजून ४० मिनिटे... महाराष्ट्र राज्याचा गाडा ज्या इमारतीतून हाकला जातो. अशा मंत्रालयाच्या इमारतीला अचानक आग लागली आणि हा हा म्हणता चौथ्या ते सहाव्या मजल्यापर्यंत सर्वच मजले जळून खाक झाले. इमारतीला आग लागताच प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन बाहेर पडत असताना ७ शूरवीरांनी सातव्या मजल्यावर धाव घेऊन मंत्रालयावर डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाला आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचवले. या घटनेनंतर सातही शूरवीरांचा सत्कार करून राज्य सरकारने त्यांच्यावर आश्वासनांची खैरात केली. पण मागील ५ वर्षांत आघाडी सरकारसहित युती सरकारनेदेखील यापैकी एकाही आश्वानाची पूर्तता न करत या शूरवीरांच्या साहसाची थट्टाच केली आहे.

कोण आहेत हे सात शूरवीर-

राजेंद्र मुरलीधर कानडे, प्रेमजी रोज (मृत पावले), दीपक हडसूळ, सुरेंद्र जाधव, गणेश मुंज, सुरेश बारिया, विशाल राणे.

हे आहे त्यांचे काम-

गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी मंत्रालयावर झेंडा फडकवतात आणि संध्याकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी झेंडा उतरवण्याचे काम करतात

काय दिले होते आश्वासन ?

आग लागली होती, तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे सरकार होते. त्यावेळी सरकारने या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना मुंबईत हक्काचे घर तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या कर्मचाऱ्यांना ना घर मिळाले ना त्यांच्या मुलांना पदवीपर्यंत शिक्षणाचा खर्च मिळाला. विशेष म्हणजे तेव्हा विरोधी पक्षात असणारे सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या पदवीपर्यंत शिक्षणाचा खर्च सरकारने उचलला पाहिजे, असे सांगितले होते. मात्र सरकारमध्ये येताच त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या मुलांचा १० वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्चच सरकार उचलेल, असे जाहीर केले.

वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष

या कर्मचाऱ्यांनी हक्काच्या घरासाठी राज्य सरकारशी वारंवार पत्रव्यवहार केला. त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ असो वा जलसंपदा मंत्री सुनील तटकरे. या सर्वांनी त्यांना आश्वासनाखेरीज काहीच दिले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील या कर्मचाऱ्यांनी पत्र पाठवून दाद मागितली. मात्र अजूनही या कर्मचाऱ्यांच्या पत्राची दखल घेण्यात आलेली नाही.

मुंबईत आमचे हक्काचे घर नाही. त्यामुळे आम्ही त्यावेळी सरकारकडे हक्काचे घर मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र अजूनपर्यंत आम्हाला घर मिळालेले नाही. पदवीपर्यंत मुलांचा खर्च उचलू, असे सांगणाऱ्या तावडेंनीही शिक्षण मंत्री झाल्यानंतर १० वी पर्यंत खर्च उचलण्याचा निर्णय घेतल्याने आमची निराशा झाली. सरकारने पोलिस आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एमएमआरडीए ५ टक्के घरे देणार असे जाहीर केले. यात आमचा देखील समावेश केला जावा.

राजेंद्र मुरलीधर कानडे, प्रमुख

झेंड्याकडे आजतागायत एकही मंत्री फिरकला नाही

मंत्रालयाच्या इमारतीवर डौलाने फडकणारा झेंडा या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो. पण एवढी मोठी घटना घडूनही या झेंड्याकडे आजतागायत एकही मंत्री किंवा आमदार गेल्या ५ वर्षांमध्ये फिरकला नसल्याचेही या कर्मचाऱ्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या