अर्थमंत्र्यांची विरोधी पक्ष नेत्यांना 'ऑफर'

मुंबई - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना विधानसभेच्या विरोधी पक्षाच्या काही नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना पक्षांतर करण्याची ऑफर देऊन त्यांची चांगलीच गोची केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना विरोधी पक्ष नेत्यांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या भाषणादरम्यान 'प्रार्थना केली की, जे अर्थसंकल्पाला विरोध करतात त्यांना यापुढे येथे पाठवू नये, तसेच विरोधी पक्षांच्या या भूमिकेमुळे पुढच्यावेळी एक-दोन आमदारच निवडून येतील अशी टीकाही केली, तसेच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना चक्क भाजपा पक्षात येण्याची ऑफर दिली.आपल्या भाषणात त्यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनाही पक्षात येण्याची ऑफर दिली.

भाषणानंतर सुधीर मुनगंटीवार यांना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनाही अशीच ऑफर देणार का असं विचारले असता, कुणालाही काहीही ऑफर देत नाही, असे वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले. त्यामुळे विरोधी पक्षांचे नेते मुनगंटीवार यांच्या या ऑफरचा किती गंभीरपणे विचार करतात, ते भविष्यात स्पष्ट होईल.

पुढील बातमी
इतर बातम्या