मोहन भागवतांचे नाव मनापासून सुचवले - उद्धव ठाकरे

अनेक वर्षानंतर देशात पूर्ण बहुमत असलेलं सरकार आलं आहे. हिंदूराष्ट्र आणि समान नागरी कायद्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम राष्ट्रपती असणं आवश्यक आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचं व्यक्तिमत्व कणखर आहे. त्यामुळेच शिवसेनेने मोहन भागवतांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवलं असल्याचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्वतःचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ येथे केलं.


'कोणाच्या मनात काय येईल, हे मला माहित नाही'

शरद पवार हे आपले गुरू आहेत, असं खुद्द मोदींनीच सांगितलं आहे. शरद पवार यांना नुकतंच ‘पद्मविभूषण’ देण्यात आलंय, असं सूचक वक्तव्य करत ते पुढे म्हणाले की, “कोणाच्या मनात काय येईल आणि काय होईल हे मला माहित नाही.” मात्र मोहन भागवतांचे नाव मनापासून सुचवलं असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचे प्रवक्ता आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सोमवारी “शरद पवार हे सक्षम नेता आणि राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार आहेत. राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावावर सहमती झाली तर भाजपानं त्यांची उमेदवारी मान्य करावी.” अशी सूचना केली होती. अशा परिस्थितीत आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली होती.

त्या दोघांनाही शुभेच्छा – उद्धव ठाकरे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. या पार्श्वभूमीवर राणेंच्या संभाव्य भाजपा प्रवेशाबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “हा निर्णय भाजपा आणि राणे यांनी घ्यायचा आहे. माझ्याकडून त्या दोघांना शुभेच्छा.” या विषयावर त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

[हे पण वाचा - बिनविरोध राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचा 'पॉवर'गेम, पवारांच्या नावाला शिवसेनेचे समर्थन]

पुढील बातमी
इतर बातम्या