या निर्णयात फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णतः बंदी लागू करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं नकार दिला होता. त्याशिवाय यावेळी फटाक्यांच्या विक्रीसाठी काही अटीदेखील लागू करण्यात आल्या असून फटाक्यांची ऑनलाइन विक्री केली जाऊ शकत नाही, असंही कोर्टानं सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं होतं. तसंच केवळ परवानाधारक व्यापारीच फटाक्यांची विक्री करू शकतात, असेही आदेश कोर्टानं दिले होते.
महाराष्ट्रात धनत्रयोदशीपासून दिवाळी सुरू होत असून सुप्रीम कोर्टाने दिवाळीमध्ये वेळेचं बंधन घातलं आहे. पण आम्ही दिवाळीआधी फटाके फोडल्याचं सांगत कोणत्याही नियमांचं उलघन केललं नाही. त्याशिवाय माननिय सुप्रीम कोर्टाने कधी दिवाळी साजरी होते आणि कधी संपते याबाबत कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाही.- संदीप देशपांडे, सरचिटणीस, मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी पार्क येथे दरवर्षी आकर्षक रोषणाई करण्यात येते. यंदाच्या वर्षीही दिवाळीच्या निमित्तानं आकर्षक रोषणाई करण्यात आली. या रोषणाईचं रविवारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मात्र या उद्घाटन सोहळ्यादरम्यान दिवाळीमध्ये फटाके फोडण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या घालून दिलेल्या वेळेला मनसेनं केराची टोपली दाखवली.
काय आहेत कोर्टाचे आदेश?
वायू प्रदूषण रोखण्यासाठी देशभरात फटाक्यांचं उत्पादन-विक्री आणि फटाके फोडण्यावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर २३ ऑक्टोबर रोजीच्या सुनावणीदरम्यान फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला होता.
दिवाळी साजरी करा, पण ठराविक वेळेतच फटाके फोडा. तसंच दिवाळीदरम्यान फटाक्यांच्या धूर आणि आवाजामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी कमी प्रदूषण करणारे फटाके फोडण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली होती. परंतु, हे फटाके फोडण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आली असून संध्याकाळी ८ ते रात्री १० पर्यंत फटाके वाजवा, असे आदेश दिले होते. तरीही नियमाचं उल्लंघन करत मनसेने शिवाजी पार्क येथे फटाके फोडत दीपोत्सव साजरा केला.