19 पैकी 9 आमदारांचे निलंबन मागे - गिरीश बापट

मुंबई - विधिमंडळात गैरवर्तन करण्याचा ठपका लावण्यात आलेल्या 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन रद्द करण्यात आलं आहे. शनिवारी विधानसभेमध्ये संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी 19 आमदारांपैकी 9 आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव ठेवत हा प्रस्ताव मंजूर केला. प्रस्ताव ठेवताना गिरीश बापट म्हणाले की, अर्थ संकल्प मांडताना विरोधी पक्षांच्या आमदारांनी अशोभनीय वर्तन केले होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली होती. डी. पी सावंत, अमित झनक, नरहरी जिरवाळ, दीपक चव्हाण, अब्दुल सत्तार, वैभव पिचड, दत्तात्रय भरणे, अवधूत तटकरे, संग्राम थोपटे या आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं. आमदारांच्या निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन 'संघर्ष यात्रा' काढली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विधानभवन परिसरात केलेल्या आंदोलनांमुळे 19 आमदारांचे 9 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी 19 आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी सकारात्मक आहोत, असे शुक्रवारी विधान परिषदेत जाहीर केले होते. तसेच शनिवारी याबाबत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले होते. 

पुढील बातमी
इतर बातम्या