final year exams: अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबंधी निर्णय घ्या, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे पुन्हा एकदा मागणी

अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबंधी लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनामुळे किती काळ जैसे थे स्थितीत राहणार, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हे योग्य नाही, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षांचा मुद्दा निकाली काढण्याची मागणी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंगळवार ११ आॅगस्ट रोजी चर्चा केली.  या चर्चेत उद्धव ठाकरेदेखील सहभागी झाले होते. (take a decision on final year university exams maharashtra cm uddhav thackeray ask pm modi) 

यावेळी कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षातील परीक्षांच्या मुद्द्यालाही हात घातला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, विद्यार्थी हे देशाचं भवितव्य आहेत. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात परीक्षा देण्याच्या नावाखाली त्यांचा जीव धोक्यात घालणं चुकीचं ठरेल. त्यामुळे अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्यात यावं. कोरोनाचं संकट किती काळ देशात सुरू राहील, याचा थांगपत्ता नाही. त्यामुळे परीक्षांचा मुद्दा लटकत ठेवणं योग्य नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी देशपातळीवर एकच निर्णय व्हायला हवा, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली.

वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाबाबत देखील लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास त्यांच्या इच्छेनुसार त्यांची कोरोना युद्धात मदत घेता येईल, अशी सूचना देखील उद्धव ठाकरे यांनी केली.


हेही वाचा-  

Medical Exams: विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नकोच- अमित देशमुख

University Exams 2020: अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच! राज्य सरकार निर्णयावर ठाम


पुढील बातमी
इतर बातम्या